मुंबई : पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती केंद्राद्वारे आयोजित केलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्सर अशा १२ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईमध्ये सीबीआयच्या पथकांनी महत्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत. पश्चिम रेल्वेने दिलेल्या तक्रारीवरून, रेल्वे भरती केंद्राद्वारे घेण्यात आलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोपाखाली रेल्वेचे काही अधिकारी आणि मुंबईतील एका खाजगी कंपनीच्या अज्ञात अधिकार्यांसह अन्य संबंधितांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. व्हॉट्स ॲपवर काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होती, असा आरोप आहे.
जीडीसीईच्या कोट्यातून ३ जानेवारी २०२१ रोजी रेल्वेमध्ये बिगर-तांत्रिक श्रेणी (नॉन ग्रॅज्युएट), कनिष्ठ लिपिक/टायपिस्ट आणि प्रशिक्षित लिपिक या पदासाठी संगणक आधारित परीक्षा घेण्यात आली होती. मुंबईसह अहमदाबाद, इंदूर, राजकोट, सुरत, वडोदरा अशा सहा शहरांमध्ये २८ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत आठ हजार ६०३ उमेदवार सहभागी झाले होते. जीडीसीईच्या परीक्षेला बसलेल्या काही उमेदवारांकडून पैसे घेऊन परीक्षा सुरू होण्यापूर्वी उत्तरांसह प्रश्नपत्रिका पुरवल्या गेल्या. काही उमेदवारांना व्हॉट्सॲप संदेशाद्वारे तर, काही उमेदवारांना मेळाव्याद्वारे प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष दाखविण्यात आली. शिवाय, परीक्षेच्या काही दिवसांनंतर उमेदवारांना व्हॉट्स ॲप लिंकद्वारे परीक्षेचा निकाल देखील देण्यात आला होता. कंपनीची परीक्षा संचालन संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कंपनीच्या माध्यमातून हा सर्व प्रकार घडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.