पुणे : शहरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करून चोरटे मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत असल्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी अशा घटना (स्ट्रीट क्राइम) रोखण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तरुणाचा मोबाईल घेऊन चोरटे पसार-
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अलंकार चित्रपटगृहाजवळ एका तरुणाचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सुधांशू सुदेश दळवी (वय २३, रा. परेल, मुंबई) या तरुणाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो पुणे स्टेशन परिसरात मोबाईलवर प्रवासी गाडीचे लोकेशन बघत होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या हातातील २५ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला.
कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुबाडले-
चोरट्यांनी एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील सहाशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना कोथरूड परिसरातील गोसावी वस्तीमध्ये ३१ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत अक्षय बालाजी झोंबाडे (वय २९, रा. हॅप्पी कॉलनी) या तरुणाने तक्रार दिली आहे. याबाबत रवी वाघमारे (रा. गोसावी वस्ती) यांच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ज्येष्ठाचा मोबाईल, रोकड हिसकावून चोरटे पसार-
बसची वाट बघत थांबलेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीशी चोरट्यांनी झटापट करून मोबाईल आणि दीड हजारांची रोकड हिसकावून नेली. येरवडा येथील गुंजन चौकात ३१ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी धर्मेंद्रकुमार शंकर सिंह (रा. गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चाकूचा धाक दाखवून लुबाडले –
मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीच्या खिशातून साडेपाच हजार रुपये काढून घेतले. ही घटना लोणीकंद परिसरातील तुळापूर येथील भावडी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री घडली. याबाबत गणेश किसन चौधरी (वय ३८, रा. खेड) यांनी तक्रार दिली आहे. चौधरी यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी सौरभ शिंदे याच्यासह चार जणांवर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.