मुंबई : देशातील सर्वाधिक गजबजलेल्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये ‘कार-फ्री फ्रायडे’ हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भारतातील कोणत्याही कॉर्पोरेट क्षेत्रात प्रथमच अशा प्रकारची मोहीम राबवली जात असून, BKC मध्ये कार्यरत असलेल्या सुमारे २ लाख व्यावसायिकांना शुक्रवारी स्वतःची कार किंवा कॅब वापरण्याऐवजी ट्रेन, मेट्रो आणि बससारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) या मोहिमेचे नेतृत्व करत असून, बेस्ट (BEST), मुंबई मेट्रो, वाहतूक पोलीस आणि रिक्षा युनियन्स यांचे सहकार्य मिळत आहे. शुक्रवारची निवड यासाठी करण्यात आली आहे की, या दिवशी कॉर्पोरेट कार्यालयांतील कामाचे वेळापत्रक तुलनेने लवचिक असते. बैठका कमी असतात आणि कर्मचाऱ्यांवर ठराविक वेळेत कार्यालयात पोहोचण्याचा ताणही कमी असतो. याउलट, कामाचा ताण आणि वेळेची बंधने अधिक असल्याने सोमवारचा पर्याय जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे.
BKC परिसरात आधीपासूनच सार्वजनिक वाहतुकीचे सक्षम जाळे उपलब्ध आहे. मेट्रो मार्ग ३ (अक्वा लाइन) BKC ला थेट जोडते, तर वांद्रे आणि कुर्ला स्थानकांहून फीडर सेवा उपलब्ध आहेत. बेस्ट दररोज १०० हून अधिक बसेस चालवते आणि त्यातून २५ ते ३० हजार प्रवासी प्रवास करतात. तरीही स्थानक किंवा मेट्रो स्टेशनपासून कार्यालयापर्यंतच्या ‘लास्ट-माईल’ कनेक्टिव्हिटीचे आव्हान कायम आहे. आकडेवारीनुसार, मेट्रो सुरू झाल्यानंतरही ५२ टक्के कर्मचारी खासगी वाहने, टॅक्सी किंवा रिक्षांचा वापर करतात, तर केवळ २५ टक्के कर्मचारी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे अनेकांचा दररोज दोन तासांहून अधिक वेळ प्रवासात खर्च होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी बसेसच्या फेऱ्या वाढवणे, चौकांमध्ये स्वतंत्र यू-टर्न लेन तयार करणे, सावलीयुक्त पदपथ आणि मिस्ट ब्लोअर्स उभारणे अशा उपाययोजनांवर काम सुरू आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचे आवाहन कंपन्यांना करण्यात आले आहे.







