मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा स्पेशल २६ हा चित्रपट तुम्हाला माहितच असेल, ज्यात तो नकली अधिकारी बनून छापे टाकतो आणि व्यावसायिकांना लुटतो. तसंच मुंबईत घडलं आहे. मुंबईत पोलिस असल्याची बतावणी करत सहा जणांनी प्रसिद्ध मैसूर कॅफेच्या मालकाच्या घरात घुसून तब्बल २५ लाख रुपयांची लूट केली आहे. मुंबईतील सायन भागातील कॅफे मालकाच्या घरात गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करत सहा जण घुसले आणि त्यांनी २५ लाख रुपये लुटले. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. या सहा जणांपैकी चौघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील माटुंगा परिसरात लोकप्रिय मैसूर कॅफे चालवणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी सायन हॉस्पिटलजवळ असलेल्या त्याच्या घरी सहा जण आले आणि त्यांनी मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचं सांगितलं. तक्रारीचा दाखला देत त्यांनी आम्ही निवडणूक ड्युटीवर असल्याचं सांगितलं. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या घरात पैसे ठेवल्याची माहिती मिळाली आहे, त्यावरुन आम्ही तपासायला आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं.
मुंबईत २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्याचाच फायदा घेत या चोरट्यांनी कॅफे मालकाला गंडा घातला. अधिकारी बनून आलेल्यांना कॅफे मालकाने सांगितले की, आमच्याकडे खाद्यपदार्थ व्यवसायातून केवळ २५ लाख रुपये रोख आहेत आणि या पैशांचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. त्यानंतर आरोपींनी २५ लाख रुपये घेतले आणि कॅफे मालकाला या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ते निघून गेले. यानंतर जेव्हा कॅफे मालकाने सायन पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, तेव्हा अशी कुठलीही धाड पडल्याची माहिती नसल्याचं पोलिसांना सांगितलं. तसेच, एकही पोलिस त्यांच्या घरी गेला नसल्याचंही पोलिसांनी त्यांना सांगतिलं. तेव्हा त्यांना लुटलं गेल्याचं समोर आलं. त्यानंतर कॅफे मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सहापैकी चार आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात निवृत्त पोलिस हवालदार आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.