मुंबई : वाहन चालवण्याचा परवाना नसणे, बिल्ला (बॅज) न लावणे, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र नसणे, वायू प्रदूषण प्रमाणपत्र वैध नसणे, क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणे, विनापरवाना वाहतूक करणे, मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे या विविध प्रकरणांत वडाळा आरटीओने कारवाई करत वाहनचालकांना धडा शिकविला असून, आर्थिक वर्षात १५ हजार २३६ प्रकरणांत ३७१.२८ लाख रुपये वसूल केले आहेत. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, मालवाहू आणि प्रवासी वाहने चालविण्यासाठी परवाना लायसन्स नसलेली एक हजार ६७० प्रकरणे नोंदविली गेली. या प्रकरणांत १६.२१ लाख दंड वसूल करण्यात आला. वाहनाचे विधिग्राह्य विमा प्रमाणपत्र नसल्याने २ हजार ९९७ प्रकरणांत कारवाई करत २६.८८ लाख वसूल करण्यात आले. प्रखर क्षमतेचे हेडलाईट ब्लबचा वापर केल्याने ५६२ प्रकरणांत २.२३ लाख वसूल करण्यात आले.
विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, वेग मर्यादेची उल्लंघन करणे, मद्यपान, नशा करून वाहन चालविणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, आदी प्रकरणांमध्ये दोन हजार २६३ परवाने रद्द करण्यात आले आहेत. वाहन चालक, मालक यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहनाच्या मोटार वाहन करांचा भरणा नियमितपणे करावा आणि होणारी संभाव्य दंडात्मक कारवाई टाळावी. ६०१ प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतूकप्रकरणी १८५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. २४.५१ लाख तडजोड शुल्क तर ३१.७५ लाख मोटार वाहन कर वसूल करण्यात आला. एकूण ५६.२६ लाख वसूल झाले. अवैध विद्यार्थी वाहतूक करणारी इतर वाहने व स्कूलबस, अशा एकूण एक हजार ७९३ वाहनांची तपासणी करण्यात आली. ३३५ वाहनांवर कारवाई करत १४.०२ लाख वसूल करण्यात आले. खासगी वाहनांनी वाहन नोंदणीपासून १५ वर्षे वयापुढील वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे, तर परिवहनमधील वाहनांच्या वाहन नोंदणीपासून ८ वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी तर आठ वर्षांवरील वयाच्या परिवहन वाहनांना दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे ३ हजार ३४८ प्रकरणांत ३५.०८ लाख रुपये वसूल करण्यात आले. १० हजार ५०० रिक्षा आणि टॅक्सीची तपासणी करण्यात आली. ३ हजार ४०० वाहनांवर कारवाई करण्यात आली. ६१.०५ लाख तडजोड शुल्क वसूल करत ८५८ प्रकरणांत परवाना निलंबित करण्यात आला. विनापरवाना जाहिरात केली म्हणून ९२१ प्रकरणांची नोंद झाली. दंडापोटी १.४९ लाख वसूल करण्यात आले.