पुणे : महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आपल्या जीवनात पद मिळण्याचा आनंद क्षणिक असतो, मात्र उपचाराने बरे झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून मिळणारा आनंद हा खरा आनंद असतो आणि आरोग्य सेवा देणे आणि गरीब रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा आहे, असे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, धीरज घाटे, जगदीश मुळीक, राजन तेली, विद्याधर अनास्कर, सनी निम्हण आदी उपस्थित होते. आरोग्य शिबिरात नि:स्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे आणि आयोजकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, उत्तम शिक्षण आणि आरोग्य सेवा आपल्या कुटुंबियांना मिळाव्यात अशी गरीबातल्या गरीब माणसाची इच्छा असते. आज विज्ञानाने प्रगती केली असताना प्रदूषण, वातावरणातील बदल, बदलती जीवनशैली यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उपचारावरचा खर्च चिंतेची बाब झाली आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात रुग्णालायांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. हे करतांना अनेक रोग नेहमीच्या यादीत नसतात पण त्यांच्यावर वेळेत उपचार करणे गरजेचे असते. यासाठी अशी शिबिरे उपयुक्त ठरतात.
राज्यात गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक प्रथितयश डॉक्टरांनी या शिबिरात वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य केले. या माध्यमातून शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार करण्यात आले.या माध्यमातून आरोग्य सेवेचा पॅटर्न महाराष्ट्रात सुरू झाला. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्याची नवी श्रृंखला सुरू झाली आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. स्व.विनायक निम्हण हे जनसमान्यांच्याप्रति संवदेना असलेले, समाजाची स्पंदने ज्याला समजतात असे सामाजिक नेतृत्व होते. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम करताना त्यांचा वारसा आणि वसा त्यांच्या कुटुंबियांनी पुढे सुरू ठेवला. त्यामुळे ६० हजार रुग्णांना आज लाभ झाला आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले.
ग्रामविकासमंत्री श्री.महाजन म्हणाले, राज्यातील सर्व जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येऊन नामांकित डॉक्टरांच्या सहकार्याने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्यास गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. अवयवदान, रक्तदान, मुखकर्करोग, स्तनाचा कॅन्सर याबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. लोकसहभागातून हे सेवाकार्य करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजूंना ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचेही श्री.महाजन म्हणाले. यावेळी निरामय फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, श्री.निम्हण यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. एकूण ९० बाह्यरुग्ण कक्षाद्वारे शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते शिबिरासाठी आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी शिबिराला भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला.