जन्म झाल्यावर बाळासाठी आईचे दूध म्हणजे अमृत्ततुल्यच जन्म झाल्यावर अर्ध्या तासात आईचे दूध मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे बाळाचे पोषण तर होतेच पण त्याचबरोबर त्याची रोगप्रतिबंधक शक्तीही वाढते. मात्र काही वेळी स्तनपान बाबत अजूनही बरेच गैरसमज निर्माण झालेले आहे, आणि त्याच गैरसमजामुळे बाळाला योग्य त्या प्रकारे स्तनपान दिले जात नाही…तसे पाहता स्तनपानामुळे बाळा बरोबर आई ल देखील असंख्य फायदे आहेत…मातेचे पोट लवकर कमी होते आणि तिच्या अंगावर जाणे लवकर कमी होते. जास्त वेळा अंगावर पाजल्याने आईच्या दुधाचे प्रमाण वाढते. अंगावर पिताना आईच्या कुशीची बाळाला उबही मिळते. लवकर स्तनपानाचा सल्ला प्रत्येक मातेला द्यायलाच हवा.
आईचे दूध हे तिच्या शरीरात गरोदरपणातच तयार होते. बाळंतीण झाल्यानंतर २-३ दिवस ते चिकासारखे घट्ट असते. बाळाला हे पहिले चिकाचे दूध मिळणे अत्यंत गरजेचं आहे कारण यातूनच बाळाला पहिली रोगप्रतिबंधक शक्ती मिळते. आईच्या दुधात आवश्यक ती सर्व सत्त्वे असतात. त्यात बाळाला आवश्यक तेवढे पाणीदेखील असते. जास्त वेळा पाजल्याने जास्त दूध निर्माण होते. जुलाब आणि न्यूमोनियासारख्या रोगांपासून यामुळे बाळाचे सहज संरक्षण होते. अंगावर पिणारी बाळे चोवीस तासात साधारण आठ वेळा दूध पितात. ज्यांना दूध पोटभर मिळतं ती बाळे सलग दोन तीन तास झोपतात. त्यांचे वजनही नियमितपणे वाढते. मुलींनादेखील अंगावर वेळोवेळी पाजले जात आहे याची खात्री करावी. अंगावर पाजल्यामुळे बाईची मासिक पाळी लांबते. अशा त-हेने स्तनपानाने संतती नियमनदेखील आपोआपच होते.
🔳 स्तनपानाची प्राथमिक तत्त्वे..
स्तनाच्या बोंडावरच्या चिरा, सूज, दूध बाहेर न पडल्यामुळे स्तन ठणकणे या सगळयांवर वेळीच उपाय करण्यास आपण मदत केली पाहिजे. जर बोंडे आतल्या बाजूला वळलेली असतील तर बाळाला ती नीट चोखता येणार नाहीत. अशी बोंडे वेळीच रोज थोडी ओढून तेल लावून तयार करावीत. ही काळजी गरोदरपणातच घ्यावी हे बरे.
मी चांगल्या पध्दतीने पाजू शकते असा आत्मविश्वास आईच्या मनात निर्माण केला पाहिजे. तसेच तिच्या दुधातून बाळाला आवश्यक ती सर्व सत्त्वे मिळतात हे देखील सांगितले पाहिजे. जर दूध येत असेल तर दोन वर्षापर्यंतसुध्दा स्तनपान देणे फायद्याचेच आहे. मूल सहा महिन्याचे झाल्यानंतर इतर पूरक अन्नही चालू करणे आवश्यक आहे.
🔳 स्तनपानासाठी काही महत्त्वाच्या बाबी…
👉🏻लवकर स्तनपान – बाळ जन्मल्यानंतर अर्धातासात स्तनपान सुरु करावे.
👉🏻याने अनेक लाभ होतात. दूध लवकर सुटते. बाळाला उब मिळते. प्रतिकारशक्ती मिळते.
👉🏻निव्वळ स्तनपान ६ महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त स्तनपान द्यावे.
👉🏻वरचे काहीही देऊ नये, पाणीही नको. याने बाळ निरोगी राहते, त्याचे योग्य पोषण होते.
👉🏻योग्य स्तनपान – स्तनपानाची योग्य पध्दत शिका-शिकवा
🔳 स्तनपानासाठी काही गोष्टी साठी विशेष लक्ष द्यावे….
- आईला स्तनपान देण्यास मदत करा. पहिलटकरणीला तर मदत लागतेच.
- पाजण्याआधी प्रत्येक वेळी बोंडे कोमट पाण्याने स्वच्छ केली पाहिजेत.
- बाळाला मांडीवर आडवं ठेवावं. जर आई कुशीवर झोपली असेल तर बाळाला तिच्या बाजूला कुशीत ठेवावे.
- बोंडांचा मुळापासूनचा भाग धरून तो बाळाच्या तोंडात द्यावा. अशा त-हेने संपूर्ण बोंड बाळाच्या तोंडात जाईल.
- बाळाचे तोंड आणि संपूर्ण शरीर आईच्या छातीकडे वळलेले असावे. बाळ वेडेवाकडे धरु नये याची काळजी घेतली पाहिजे.
- बाळाच्या डोक्याला एका हाताने आधार दिला पाहिजे.
- बाळाने बोंड सोडल्यावर ते बोंड स्वच्छ करायला हवे.
- एक बाजू पाजून झाल्यावर बाळाला दुस-या बाजूला धरले पाहिजे.
- बोंडांना चिरा असतील तर त्यांना मालीश करायला आईला मदत केली पाहिजे. त्यावर हळद आणि साधे गोडेतेल लावावे. यावेळी बोंडावर प्लास्टिकची निपल वापरणे फायदेशीर ठरते.
- बसलेली बोंडे आपण अलगद हाताने बाहेर ओढावीत. बसलेली किंवा सूज आलेली असताना बोंडावर मऊ रबराचे निपल ठेवून बाळाला पिऊ द्यावे. याने बोंडे बाहेर येण्यासही मदत होते. हे निपल पाजायच्या आधी आणि नंतर स्वच्छ केले पाहिजे.
बाळ एका बाजूला पीत असताना कधीकधी दुस-या स्तनातून दूध गळत रहाते. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही.
🔳स्तनपानासाठी योग्य स्थिती ..
बाळाची स्तनांवर योग्य पकड महत्वाची आहेच, परंतु स्तनपान देताना आई आणि बाळ दोघांची स्थिती बरोबर असणे सुद्धा महत्वाचे आहे. दोघेही आरामदायक स्थितीमध्ये असले पाहिजेत
१. क्रॉस क्रेडल होल्ड: सुरुवातीच्या काळात स्तनपानासाठी ही स्थिती वापरा हि स्थिती खूप कॉमन आहे आणि नवीन मातांसाठी त्याची खूप मदत होते कारण ह्या स्थितीत प्रसूतीनंतर लगेच बाळाची स्तनांवरील पकड योग्य असते. सुरुवातीला थोडे ओशाळल्यासारखे होऊ शकते, तथापि ह्या स्थितीचा सराव केल्यास ह्या स्तनपानाच्या स्थितीची आई आणि बाळासाठी खूप मदत आणि फायदा होतो. हात असलेल्या खुर्चीवर ताठ बसा. तुमच्या बाळाला पोटाशी धरा तुम्ही पाजत असलेल्या स्तनाच्या विरुद्ध बाजूच्या खुर्चीच्या हाताचा वापर बाळाला टेकवण्याची करा आणि तुमच्या हाताच्या तळव्याने बाळाच्या डोक्याला आधार द्या. मोकळा हात स्तनाला खालून आधार देण्यासाठी आणि बाळाचे तोंड स्तनाग्रांपर्यंत येण्यासाठी मार्गदर्शनासाठी वापरा
२. क्रेडल होल्ड: तुमचे बाळ काही आठवड्यांचे झाल्यावर आणि तुम्हाला बाळाला नीट धरण्याची सवय झाल्यावर स्तनपानासाठी तुम्ही क्रेडल होल्ड ही स्थिती वापरू शकता ताठ बसा आणि बाळाला तुमच्या मांडीवर घेऊन एका कुशीवर झोपवा. कुशीवर झोपवताना बाळाचा चेहरा आणि शरीर तुमच्या बाजूला ठेवा. तुमच्या हातानी बाळाचे डोके, पाठ आणि नितंबाकडील भागाला आधार द्या. दुसऱ्या हाताने तुमचे स्तन धरा आणि हळूच दाबा जेणेकरून ते बाळाच्या नाकाजवळ जाईल
३. फ़ुटबाँल होल्ड: ही स्थिती अमेरीकन फ़ुटबाँल पासून प्रेरित होऊन तयार झाली आहे. जर तुमचे सी-सेक्शन झाले असेल किंवा तुम्हाला जुळ्या बाळांना स्तनपान करायचे असेल तर ही स्थिती चांगली आहे. तुमच्या बाळाला खाली आधार देऊन धरा. बाळाचे डोके आणि मान तुमच्या हातात धरा .तुम्ही ज्या बाजूने बाळाला पाजत आहात त्याच बाजूला मागे बाळाला त्याचे पाय नेऊद्या तुमच्या हाताला आधार देण्यासाठी तुम्ही उशीचा आधार घेऊ शकता आणि तुमचा जो हात रिकामा आहे त्या हाताने बाळाचे तोंड तुम्ही स्तनापर्यंत नेऊ शकता.
४. साईड लाईंग :ही स्थिती ज्यांची सिझेरिअन प्रसूती झाली आहे किंवा प्रसूती नंतर शरीर नाजूक झाले असेल तर त्यांच्यासाठी चांगली आहे. कुशीवर झोपा आणि बाळाचे तोंड तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने बाळाला कुशीवर झोपवा. तुमच्या खालच्या स्तनाजवळ बाळाचे डोके येईल असे बाळाला ठेवा. हाताने बाळाच्या डोक्याला आधार द्या आणि जरूर भासल्यास मोकळ्या हाताने स्तन तोंडाजवळ न्या.
५. रिक्लायनिंग होल्ड: ज्या स्त्रिया सी-सेक्शन प्रसूतीमधून रिकव्हर होत असतात किंवा ज्यांना बसण्यास त्रास होत असेल त्यांच्यासाठी ही स्थिती उपयोगी आहे. ज्या स्त्रिया बाळाला बेड वर पाजतात त्यांनी ह्या स्थितीचा सराव करा. बेड किंवा सोफ्यावर आरामदायक स्थितीत बसा. उशीचा आधार घ्या आणि तुमच्या पाठीचा वरचा भाग, मान आणि डोके आरामदायक स्थितीत आहे ना ह्याची खात्री करा. तुमच्या बाळाला पोटावर झोपवा आणि तुमच्या छातीजवळ घ्या आणि बाळाचे तोंड स्तनाग्रांजवळ न्या. बाळ अगदी नैसर्गिकरित्या स्तनाग्रे शोधेल. जर गरज भासली तर तुम्ही स्तन हातात घेऊन बाळाच्या तोंडाजवळ नेऊ शकता.
स्तनपान दिल्याने बाळाचे उत्तमरीत्या पोषण होते त्यामुळे पहिले सहा महिने डॉक्टर प्रत्येक नवजात बाळाला स्तनपान देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच, स्तनपान दिल्याने जी संप्रेरके तयार होतात त्यामुळे बाळाच्या आईची रिकव्हरी जलद होते. तथापि बऱ्याच मातांना स्तनपान देणे वेगवेगळ्या कारणांमुळे अवघड वाटते. काहींना योग्य रित्या स्तनपान कसे द्यावे ह्याचे ज्ञान नसते. त्यामुळे स्तनपान योग्य रित्या कसे करावे ह्याची माहिती असणे आवश्यक आहे, त्यामुळे स्तनपान करताना काही समस्या असल्या असतील तर त्या हाताळता येतील.
◾लेखिका : डॉ. राजश्री प्रफुल राऊत, एम. एस.( प्रसूती व स्त्री रोग तज्ञ) , नागपूर.