मुंबई : मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील काही भागात पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दादरची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रस्ते आणि रेल्वे मार्गावर पाणी साचले आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की रस्त्यावर धावणाऱ्या गाड्याही अर्ध्या पाण्यात बुडाल्या आहेत. रेल्वे रुळावरही पाणी साचले आहे. सायन, भांडुप आणि नाहूर स्थानकांदरम्यानची रेल्वे सेवा प्रभावित झाल्याचे सीपीआरओचे म्हणणे आहे. ट्रॅक पाण्यात बुडाले होते, त्यामुळे सुमारे तासभर गाड्या थांबल्या होत्या. पाणी थोडे कमी झाल्यानंतर पुन्हा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे सेवा अजूनही प्रभावित आहे. दुसरीकडे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या ‘बेस्ट’ नेही अनेक मार्गावर पाणी तुंबल्याने काही बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण १३ मार्गाचा समावेश आहे. ही सर्व परिस्थिती पाहता मुंबई महानगर पालिकेने सर्व नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर अपत्कालीन क्रमांक जारी करत गरज पडल्यास मदत मागण्याचे आवाहन केले आहे. १९१६ हा टोल फ्री क्रमांक बीएमसीने जारी केला आहे.