मुंबई : मुंबई महानगरातील यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुंबई महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीत यंदा नागरिकांना त्यांच्या घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सदर तलावांची यादी गुगल मॅप्सवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. गुगल मॅप्समध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी भाविकांना महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व कृत्रिम तलावांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. याद्वारे गणेश भक्तांना आपल्या घराजवळ असलेल्या कृत्रिम तलावाची देखील माहिती या मॅपद्वारे मिळणार आहे. यंदा कृत्रिम तलावांची संख्या २०० पेक्षा अधिक वाढविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार गेली दहा वर्षे शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षाकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील दहा वर्षात सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे व त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे स्वयंघोषणापत्र आवश्यक असणार आहे. या परवानगीचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असेल. एक खिडकी योजनेनुसार संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ‘क्यू आर कोड’द्वारे देखील भाविकांना, गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा क्यू आर कोड’ श्री गणेश मूर्तिकारांच्या मंडपा बाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत होणार आहे.