पुणे : पुण्यात फर्ग्युसन रोडवरील L3 बारमधल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्जचा पुरवठा केल्याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये आहेत. पोलिसांकडून याप्रकरणात कसून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, L3 बार ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. आर्यन पाटील आणि अक्षय स्वामी असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अभिषेक सोनवणे या ड्रग्ज पेडलरने पार्टीसाठी हे ड्रग्ज आर्यन पाटीलकडे दिले आणि त्यानंतर आर्यन पाटीलने ते ड्रग्ज इतरांकडे दिले होते. या ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे.
पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात पोलिस अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे देखील निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. तसचं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरिक्षक आणि उपनिरिक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पुणे महानगर पालिका आणि राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील हॉटेल, पब आणि बारवर पुणे महानगर पालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पब आणि बारच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा फिरवला. त्यानंतर पीएमआरडीएने पुण्यातील भुगाव, भुकूम परिसरातील हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. तसंच, राज्य उत्पादन शुल्काकडून देखील पब, बार आणि हॉटेलची झाडाझडती सुरूच आहे.