नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने सायन-पनवेल मार्गावर वाशी गाव येथे दोन कोटी ८० लाखांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. मुंबईच्या माहिममधील दोघांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी कक्षाला मुंबईत राहणारे दोघेजण अमली पदार्थ घेऊन पनवेलच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सायन-पनवेल मार्गावर सापळा लावला होता. पहाटे पावणे तीनच्या सुमारास फजल खान व सलाउद्दीन शेख हे दोघेही स्कुटीवरून जात असताना वाशी गाव येथे त्यांची पोलिसांकडून झडती घेण्यात आली.
यावेळी फजल खान याच्याजवळ ७०० ग्रॅम वजनाचे तब्बल एक कोटी ४० लाखांचे, तर सलाउद्दीन शेखजवळ ३०४ ग्रॅम वजनाचे ६० लाख ८० हजारांचे मेफेड्रोन होते. या अमली पदार्थाचे बाजारमूल्य दोन कोटी ८० लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल आहे.