पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल अडचणीत आले आहेत. मंगलदास बांदल यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. त्यांची तब्बल ८५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. मंगलदास बांदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवार यांचा मंगलदास बांधल यांनी प्रचार केला होता. मंगलदास बांदल यांची पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात असलेली मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती. मनी लॉड्रिंग प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. त्यावेळी बांदल यांना अटक केली होती. ईडीने बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली. बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत शंभाजी खेमधरे, सतीश आणि यतिश जाधव यांचीही संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते ईडीच्या रडारवर आहेत. आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. हे ईडीची सर्वात मोठी कारवाई म्हटले जात आहे.