मुंबई : एसटीच्या संबंधीत प्रवाशांच्या असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. एसटी प्रवासात प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी आता प्रत्येक बसमध्ये आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखांचे दूरध्वनी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास करताना प्रवाशांना आलेल्या तक्रारींचा निपटारा करणे सोपे होणार आहे. एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत आहे, चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत आहे, वाहक उद्धट बोलतो किंवा वाहकाने योग्य ठिकाणी आम्हाला उतरले नाही अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात. मात्र या तक्रार नेमकी कुठे कराव्यात, हा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो. यापूर्वी एसटी बसेस मध्ये संबंधित आगाराचा व स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केला असायचा, परंतु काही काळाने हे नंबर दिसेनासे झाले.
त्यामुळे एसटीच्या प्रवासामध्ये काही समस्या अथवा अडचण आल्यास त्यासाठी दाद कोणाकडे मागावी? हा एक मोठा प्रश्न प्रवाशांच्या समोर होता. त्यामुळे त्यांच्याच सूचनेवरून एसटी महामंडळाने आता प्रत्येक बसमध्ये ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचे किंवा तक्रारी चे निराकरण तातडीने व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान त्यांना एखाद्या अडचण आल्यास थेट तिथे प्रदर्शित केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या अडचणीत अथवा समस्येचे निवारण तातडीने करून घ्यावे. एसटी महामंडळाच्या नव्या निर्णयानुसार आता बसमधील ड्रायव्हर सीटच्या पाठीमागील जागेवर जिथं काही सूचना लिहिलेल्या असतात, आता तिथं संबंधित बसच्या आगारप्रमुखांचा मोबाईल नंबर देण्यात येईल. त्यामुळे, प्रवाशांना प्रवासात काही अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांशी संवाद साधता येणार आहे.