मुंबई : मुंबईमध्ये होळी आणि धुळवडीसाठी पोलिस ठाण्यांसह वाहतूक पोलिसांनी अपघात, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊन सणांच्या उत्साहाला गालबोट लागू नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळाले. मात्र दिवसभरात होळी, धुळवडीत बेशिस्तपणे वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यात ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या ४२८ वाहन चालक, तसेच १२४ दारुड्या चालकांचा समावेश असून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ४५९४ जणांवर कारवाई करण्यात आली. ही आकडेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ची आहे.
मुंबईत होळी आणि धुळवड या सणांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. या सणांच्या दिवशी अनेक जण मद्यपान करून वाहने चालवत असतात आणि अपघातांना निमंत्रण देखील देत असतात. याच सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांसोबतच मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईमध्ये होळी आणि धुळवडीसाठी अपघात, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊन सणांच्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळाले.