ठाणे : लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील धबधब्यावर ५ पर्यटक वाहून गेल्याच्या घटनेनंतर आता सर्वच ठिकाणचे जिल्हाप्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. पुण्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील धबधबे, नदी आणि धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी ही माहिती दिली आहे. भुशी डॅमसारखी दुर्घटना टाळण्यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केले आहेत. भुशी डॅम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशान्वये पर्यटकांना धबधबे, नदी, धरण परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, भोज नदी, दहिवली नदी, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदीवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाटावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे धरण, माळशेज घाट, नाणेघाट, गोरखगडवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट आणि कसारा घाटातील धबधबे या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कलम १४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३४ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशांती माने यांनी दिली.