ठाणे : बाल लैंगिक शोषण ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे जेवढे लवकर शक्य असेल तेवढे लवकर बालकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याची माहिती होणे आवश्यक आहे. हा अतिशय संवेदनशील विषय असून बालकांच्या मनात कोणतीही दहशत निर्माण न करता, त्यांचे बालपण हरवणार नाही, अशा पद्धतीने त्यांना या वास्तवाबाबत संवेदनशील बनवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. बाल दिनाचे औचित्य साधून गुरूवारी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ‘बाल सुरक्षा जनजागृती सप्ताहा’चे उद्घाटन करण्यात आले. ठाणे महापालिका, ठाणे परिवहन सेवा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि अर्पण ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना धाक निर्माण व्हावा, तसेच, बालकांच्या हक्कांविषयी जागृती निर्माण व्हावी हा या सप्ताहाच्या आयोजनाचा उद्देश आहे.
ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सर्व बसगाड्यांमध्ये याबाबतचा संदेश प्रसारित केला जाणार आहे. तर, १० बस गाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या बसचे उद्घाटनही यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश इश्वर सूर्यवंशी तसेच बालकांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे ४० हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्या शैक्षणिक जबाबदारीसोबतच सुरक्षेचे दायित्वही महापालिकेवर आहे. त्यामुळे ही जनजागृती मोहिम अतिशय महत्त्वाची आहे. त्यात बालकांसोबतच शिक्षक वर्गाचेही प्रबोधन केले जात आहे. त्यामुळे हा अतिशय संवेदनशील विषय त्यांना योग्य प्रकारे हाताळता येईल, असा विश्वास महापालिका आयुक्त राव यांनी व्यक्त केला. याप्रसंगी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश इश्वर सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, अर्पण या संस्थेच्या पूजा टापरिया उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तर, अर्पण या संस्थेच्या पूजा टापरिया यांनी जनजागृती मोहिमेचे स्वरुप आणि आवश्यकता विशद केली.