मुंबई : सुमारे एक कोटी रुपयांच्या चरस पुरवण्यास आलेल्या श्रीकांत मधुकर धनू (५७) याला डोंगरी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पावणेतीन किलो चरस जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंगरी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील नवरोजी हिल रोड क्रमांक ११ येथील बीआयटी चाळीजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत होता. त्यामुळे या पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात संशयास्पद पदार्थ सापडला. पोलिसांनी अमली पदार्थ तपासणी किटद्वारे त्याची तपासणी केली असता ते चरस असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी २ किलो ८८३ ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला असून त्याची किंमत सुमारे ९१ लाख ३२ हजार रुपये आहे. चौकशीदरम्यान त्याचे नाव श्रीकांत धनू असल्याचे उघडकीस आले. तो माहीम कॉजवे दर्यासारंग सोसायटीमध्ये राहत असून डोंगरी परिसरात चरस पुरवण्यासाठी तेथे आल्याचे चौकशीत सांगितले. आरोपी व्यवसायाने चालक असून याप्रकरणी डोंगरी पोलीस अधिक तपास करत आहेत.