मुंबई : बँकॉक येथून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी २५ वर्षीय प्रवाशाला हवाई गुप्तचर कक्षाने (एआययू) मुंबई विमानतळावरून अटक केली. अटक करण्यात आलेल्या प्रवाशाकडून सुमारे पाच किलो उच्च प्रतिचा गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे गांजाची तस्करी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी एआययू अधिक तपास करीत आहे.
समीर अली अब्बासी (२५) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव असून तो नवी दिल्लीतील वसंत विहार परिसरातील रहिवासी आहे. एक प्रवासी बँकॉकहून अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती एआययूच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एआययूने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळार सापळा रचला होता. आरोपी प्रवासी समीरला एआययूने थांबवून त्याची व त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात १४ संशयास्पद पाकिटे सापडली. ती उघडून पाहिली असता त्यात हिरव्या रंगाचा पदार्थ असल्याचे आढळले. एआययूच्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ चाचणी कीटद्वारे तपासणी केली असता तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एआययूने १४ पाकिटांमधील गांजा तपासला व त्याचे वजन केले असता ते ४९७७ ग्रॅम असल्याचे समजले. त्याची किंमत एक कोटी ९५ लाख रुपये आहे. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून एआययूने समीरला अटक केली. समीरने यापूर्वीही गांजाची तस्करी केल्याचा संशय आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. दोन दिवसांतील ही दुसरी घटना असून सुमारे दोन कोटी रुपयांच्या गांजासह एका ३७ वर्षीय महिलेला एआययूने अटक केली होती.








