पुणे : दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तानाजी सर्जेराव शेगर असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदन नगर पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते. याप्रकरणी १७ मे रोजी चंदन नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीबीच्या या कारवाईनंतर पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. महावितरण विभागात काम करणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार व्यक्तिविरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यात मीटर चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे शेगर यांनी सांगितले होते. या गुन्ह्याचा तपास आपण करत असून पुढील कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी इतके पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने तडजोडीअंती ३ लाख रुपये ठरले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानंतर एसीबीने केलेल्या तपासात शेंगर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्यांच्या विरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेगर यांना १९ मे रोजी निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान हडपसर विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत होते. चौकशीकामी हजर राहण्यासाठी वेळोवेळी शेगर यांना समजपत्र बजावण्यात आले होते. मात्र जेव्हा जेव्हा समजपत्र घेऊन कर्मचारी गेला तेव्हा तेव्हा शेगर हे घरी हजर नव्हते. त्यामुळे एकतर्फी चौकशी होऊन त्यामध्ये शेगर हे दोषी आढळले. त्याशिवाय शेगर यांच्याकडे असलेल्या तपासाच्या गुन्ह्याची त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व घटना पाहता शेगर त्यांच्या वर्तणुकीमुळे पोलीस दलाची मलीन झाली आहे. त्यामुळे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २५ व २६ मधील तसेच भारतीय राज्यघटना ३११ (२) ब अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस उपनिरीक्षक तानाजी सर्जेराव शेगर यांना शासकीय सेवेतून केले आहे.