मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदेशाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. चिरागनगर येथे उभारण्यात येत असलेल्या अण्णा भाऊ साठे स्मारक आणि संशोधन केंद्रासह भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण हा त्या दिशेने उचललेला महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. नूतनीकृत नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असलेल्या चिरागनगर येथे त्यांच्या स्मृतींना साजेसे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि संशोधन केंद्र उभारण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेने अत्याधुनिक सुविधांनी सज्ज केलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण होणे ही आनंदाची बाब आहे. या नाट्यगृहात नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलाविष्कारांसाठी आवश्यक त्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंचाची क्षमता वाढविणे, कलाकारांसाठी सुसज्ज ग्रीनरूमची निर्मिती, तांत्रिक सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रेक्षकांसाठी अधिक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे येथे दर्जेदार नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे सादर करता येणार आहेत. अभिजात कला, संस्कृती आणि साहित्याला प्रोत्साहन देतानाच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सांस्कृतिक संधी पोहोचविण्याचे कार्य या नाट्यगृहाच्या माध्यमातून घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी महानगरपालिकेचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, हे नाट्यगृह केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्यासपीठ न राहता अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा आणि साहित्याचा प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचाही गौरव केला. त्यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वास्तववादी असून त्यामध्ये त्या काळातील सामाजिक विषमता, अन्याय, संघर्ष, कामगारांचे जीवन आणि वंचित समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचा मार्ग निर्माण करत त्यांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला आणि समाजातील उपेक्षित घटकांना आवाज मिळवून दिला. त्यांच्या साहित्याने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देश-विदेशातील वाचकांनाही प्रेरणा दिली आहे. त्यांच्या साहित्याचे तब्बल २७ भाषांमध्ये अनुवाद झाले असून त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा आणि लोकसाहित्य जागतिक स्तरावर पोहोचविण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. अण्णा भाऊ साठे यांचा वारसा जतन करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून स्मारक, संशोधन केंद्र आणि नूतनीकृत नाट्यगृहाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार अधिक व्यापक स्वरूपात होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, या उपक्रमांमुळे नव्या पिढीला अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक बांधिलकी समजून घेण्याची संधी मिळेल. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक समता, सांस्कृतिक समृद्धी आणि परिवर्तनाची मूल्ये अधिक बळकट होतील. त्यामुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे महत्त्वाचे कार्य या सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून पुढे सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






