कल्याण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहर परिसरात निवडणूक आयोगाची भरारी पथके आणि स्थिर सर्वेक्षण विभागाकडून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. अशाच वाहन तपासणीच्यावेळी भिवंडी पोलिसांना धामणकर नाका येथे मे. सीएमएस कंपनीचे रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन आढळले. पोलिसांंनी या वाहनाची तपासणी केली. त्यात दोन कोटी ३० लाख रूपये आढळले. या रकमेबाबत वाहन चालकासह संबधित योग्य ते पुरावे आणि खात्रीलायक माहिती देऊ शकले नाहीत त्यामुळे हे वाहन भरारी पथकाने रोख रकमेसह ताब्यात घेतले. ही माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी भरारी पथकाचे अधिकारी हेमंत पष्टे यांना दिली. निवडणूक अधिकारी धामणकर नाका येथे आले. त्यावेळी रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनात दोन जवान, दोन रक्कम संरक्षक, एक चालक असे पाच जण होते. एटीएम यंत्रामध्ये भरणा करण्यास लागणाऱ्या आकारातील बंदिस्त साच्यामधील रक्कम, वाहनातील पिशव्यांमधील रकमेची मोजणी करण्यात आली. ही रक्कम दोन कोटी ३० लाख १७ हजार असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले.
ही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी कल्याणचे प्राप्तिकर विभागाचे अन्वेषण कक्षाचे अधिकारी पवन कौशिक यांना दिली. ते घटनास्थळी आले. आचारसंहिता पथक प्रमुख सुधीर गुरव, खर्च निरीक्षक शरद यादव, कौशिक यांनी जप्त रकमेचा पंचनामा केला. ही रक्कम सिलबंद करून भिवंडी येथील कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली. जप्त वाहनातील रोख रकमेचा प्राप्तिकर अधिकारी तपास करून अहवाल सादर करतील. त्यानंतर योग्य त्या कारवाईचा निर्णय घेतला जाईल. अमित सानप निवडणूक निर्णय अधिकारी भिवंडी पूर्व.