कल्याण : प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलासह अन्य पाच जणांचे अपहरण करत, अल्पवयीन मुलाला भिवंडीजवळील जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टिटवाळा परिसरातील गोवेली जीवन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचे अन्य जातीतील तरुणीशी प्रेमसंबध होते. दोन्ही घरांतून या प्रेमप्रकरणाला विरोध होता. मुलगा मित्रांसह दुचाकीवरून कल्याणच्या दिशेने येत असताना, वडवली पुलावर एका चार चाकी गाडीने त्यांची दुचाकी अडवली. यानंतर या मुलांना चार चाकीतून भिवंडी येथील जंगलात नेण्यात आले. तिथे या मुलाला बेदम मारहाण करत संबंधित मुलीशी न बोलण्याची धमकी देण्यात आली आणि जखमी अवस्थेत सोडून देण्यात आले. या मुलाच्या भावाने खडकपाडा पोलिस ठाण्यात नीतेश जाधव, परेश ठाकरे यांच्यासह अन्य चौघांविरोधात दिलेल्या तक्रारीवरूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.