मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला त्याचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वायकर यांची खासदारकी रद्द करण्याची आणि या मतदारसंघातून आपल्याला निर्वाचित उमेदवार घोषित करण्याची मागणी कीर्तिकर यांनी याचिकेद्वारे केली आहे. मतमोजणीच्या दिवशीच मतांमध्ये तफावत आढळून आल्याने पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर त्रुटी झाल्या. त्याचा तसेच मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले गेल्याने, ३३३ बनावट मतदारांनी केलेल्या मतदानाचाही निकालावर परिणाम झाला. निवडणूक अधिकाऱ्याने मनमानीपणे मतमोजणी करण्यात घाई केल्याचा दावाही कीर्तिकर यांनी याचिकेत केला आहे. त्याचप्रमाणे, याचिकेवरील सुनावणीच्या वेळी या मतदारसंघातील संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे चित्रीकरण सादर करण्याचे आदेश द्यावेच, अशी मागणी केली आहे.
कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला होता. वायकर यांना ४ लाख ५२ हजार ६४४, तर कीर्तिकर यांना ४ लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली होती. बऱ्याच गोंधळानंतर वायकर यांना विजयी उमेदवार घोषित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, वायकर यांच्या निवडणुकीविरोधात करण्यात आलेली ही दुसरी याचिका आहे.