मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावले असून त्यांना बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. करोना काळातील खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी किर्तिकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनेही त्यांची याप्रकरणात चौकशी केली होती. खिचडी गैरव्यवहाराप्रकरणी युवा सेनाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना अटक झाल्यानंतर आता ईडीने अमोल कीर्तिकर यांना समन्स बजावले आहे. अमोल कीर्तिकर यांना बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. अमोल यांचे वडील खासदार गजानन कीर्तिकर हे सध्या शिंदे गटात आहेत. मात्र अमोल कीर्तिकर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी आहेत.
खिचडी गैरव्यवहारप्रकरणी १ सप्टेंबरला फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्सव मल्टी सर्व्हिसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा केटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व इतर काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून याच गुन्ह्याच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहे.