पिंपरी चिंचवड : बदला घेण्याच्या उद्देशाने हत्येच्या तयारीत असलेल्या टोळक्याच्या मुसक्या आवळण्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणखी एक हत्याकांड होता होता टळले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. सर्व गुंड कुप्रसिद्ध सांडभोर टोळीचे सदस्य आहेत. आरोपींकडून सात पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. या टोळीतील 7 सदस्यांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत ही कारवाई केली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आवारात जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची हत्या झाली होती. त्याचा बदला घेण्याच्या तयारीत सांडभोर टोळी होती. मात्र दरोडा विरोधी पथकाला त्याची माहिती मिळतात प्रमोद सांडभोर यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तर दोन आरोपी फरार आहेत.
मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांची आरोपी हत्या करणार होते. अमित जयप्रकाश परदेशी, मंगेश भिमराव मोरे, अनिल वसंत पवार, अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी, देवराज, शरद मुरलीधर साळवी आणि प्रमोद सोपान सांडभोर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी अक्षय चौधरी आणि देवराज फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, ही टोळी कुणाच्या हत्येचा कट रचत होती याबाबच माहिती मिळू शकली नाही. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सदर आरोपींविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गाड्यांची तोडफो आणि जाळपोळ, बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणे असे एकूण 26 गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, अहमदनगरमध्ये दाखल आहेत. पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे पोलीस, सह आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा स्वप्ना गोरे, परिमंडळ 2 चे उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम पोलीस निरीक्षक दरोडा विरोधी पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रवीण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, सागर शेंडगे, महेश खांडे, उमेश पुलगम, प्रवीण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, समीर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे आणि अमर कदम यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.