पुणे : अहमदाबाद येथील विमानतळावर गुरुवारी दुपारी घडलेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना फटका बसला. अहमदाबाद विमानतळ प्रवासी सेवेसाठी बंद केल्याने पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या या विमानांना सायंकाळी सात वाजेपर्यत उड्डाणाची परवानगीच मिळालेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना पुणे विमानतळावर तासनतास ताटकळत बसावे लागले.
पुणे विमानतळावरून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी आणि सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी अहमदाबादकडे निघणारी दोन नियमित प्रवासी विमाने रखडली. या दोन्ही विमानांना, अहमदाबाद विमानतळावर प्रवासी विमानांना तात्पुरती बंदी असल्याने परवानगी मिळालेली नाही. अपघातग्रस्त विमानाच्या स्थलांतराचे काम सुरू असल्याने सर्व आगमन व प्रस्थान उड्डाणांत तात्पुरता बदल करण्यात आला आहे, अशी प्राथमिक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटींवर दिली. या रखडलेल्या सेवांमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच नाराजी पसरली असून, त्यांच्यासाठी कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. दरम्यान, ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल अॅव्हिएशन’ (DGCA) आणि ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पुणे विमानतळ प्रशासनाकडून देखील अद्ययावत माहिती प्रवाशांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहमदाबाद विमानतळावर जेव्हा स्लॉट मिळेल तेव्हाच पुणे विमानतळावरून विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली.







