मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत सध्याचा प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अटल सेतूला जोडणारा शिवडी – वरळी उन्नत रस्ता सध्याच्या प्रभादेवी पुलावरून जाणार आहे. मात्र सुमारे १२५ वर्षे जुन्या प्रभादेवी पुलाची दूरवस्था झाल्याने तो पाडून नवीन पूल बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे एमएमआरडीए येथे नवीन पूल बांधणार आहे. एमएमआरडीएने या ठिकाणी द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या द्विस्तरीय पुलाचे बांधकाम करण्यासाठी, सध्याचा पूल पाडण्यासाठी एमएमआरडीएला मागील कित्येक महिन्यांपासून वाहतूक पोलिसांच्या परवानगीची प्रतीक्षेत होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. वाहतूक पोलिसांनी पुलाच्या पाडकामासह नवीन पूल बांधण्याच्या कामासाठी १५ एप्रिल २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत एमएमआरडीएला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. यासाठी हा पूल मंगळवार, १५ एप्रिल रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून पुलाचे पाडकाम सुरू करण्यात येणार आहे.
त्यानंतर हा पूल तब्बल २० महिने बंद राहणार असल्याने प्रवासी, पादचारी, वाहनचाक सर्वांचीच गैरसोय होणार आहे. मोठा वळसा घालून वाहनचालकांना प्रवास करावा लागणार आहे. असे असताना आता शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रभादेवी पुलाचे पाडकाम पुढे ढकलावे अशी मागणी एका लेखी पत्राद्वारे एमएमआरडीएकडे केली आहे. ‘एक्स’ समाज माध्यमावर एक पोस्ट टाकून त्यांनी ही माहिती दिली.







