पुणे : महाराष्ट्राचे औद्योगिक शहर आणि आयटी हब म्हणून पुण्याची ओळख आहे. आता याच पुण्याच्या आयटी हबमध्ये अदानींचे डेटा सेंटरही असेल. अदानी समूहाची कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्सने यासाठी पुण्यातील हवेली परिसरात २५ एकरहून अधिक जागा घेतली आहे. ही जमीन पिंपरी औद्योगिक क्षेत्रात आहे. ही जमीन फिनोलेक्स इंडस्ट्रीजची होती. या जमिनीचे भाडेपट्ट्याचे अधिकार घेण्यासाठी कंपनीने सुमारे ४७१ कोटी रुपये खर्च केले आहेत. या जमिनीत डेटा सेंटर विकसित करण्यात येणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जमिनीचा हा व्यवहार झाला. हा करार ३ एप्रिल रोजी नोंदणीकृत झाला आणि समूह कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्सने त्यासाठी २३.५२ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. खरेदी केलेली जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वस्तिक रबर प्रोडक्टला भाडेतत्त्वावर दिली होती. जगभरात डेटा सेंटर व्यवसाय हा उदयोन्मुख व्यवसाय मानला जातो. अदानी समूहाने या व्यवसायासाठी मोठी योजना तयार केली आहे.
यासाठी अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने एजकॉनेक्ससोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. दोघांची JV अदानी कोनेक्समध्ये ५०-५० टक्के हिस्सेदारी आहे. ही कंपनी आधीच चेन्नई, नवी मुंबई, नोएडा, विशाखापट्टणम आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये डेटा सेंटर तयार करण्याचे काम करत आहे. JV ने पुढील दशकात १ गिगावॅट क्षमतेच्या डेटा सेंटरचे नेटवर्क तयार करण्याची योजना आखली आहे. जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि भारतीय कंपन्यांसाठी भारतातील डेटा सेंटर सर्वात आकर्षक वाढीची संधी म्हणून उदयास येत आहेत. डेटा सेंटर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा प्रवाह येत आहे, ज्यामुळे एकाच वेळी अनेक नवीन बाजारपेठा निर्माण होत आहेत. देशात डेटा सेंटर डेव्हलपमेंटसाठी आतापर्यंत एकूण १३.५ बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीची योजना आखण्यात आली आहे.