ठाणे : भिवंडी येथील रांजनोली भागातील ‘सी रोझ बार अँड रेस्ट्राॅरंट’ या ऑर्क्रेस्टा बारवर भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारला. या बारचा व्यवस्थापक आणि अश्लील हावभाव करून नृत्य करणाऱ्या महिला वेटर यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजनोली येथे रात्री उशीरापर्यंत सी रोझ हा ऑर्क्रेस्टा बार सुरू असल्याची माहिती भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी सी रोझ बार अँड रेस्ट्राॅरंटवर छापा मारला. बारमध्ये मद्यपान करत असलेल्या गिऱ्हाईकांना येथील महिला वेटर अश्लील हाव भाव करत मद्य देत असल्याचे पथकाला निदर्शनास आले. याप्रकरानंतर पोलिसांनी तात्काळ हा प्रकार थांबविला. पोलिसांनी याप्रकरणात बारच्या व्यवस्थापकासह कर्मचारी आणि महिला वेटर विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.