ठाणे : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू वाहतूक, निर्मिती आणि विक्रीवर विशेष लक्ष दिले जात आहे. अशातच ठाण्यातून गुजरातला जाणाऱ्या १४ लाख ३२ हजारांची विदेशी बनावटीची दारू जप्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे राज्य उत्पादक शुल्क विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या नाक्यांवर दारू विक्री आणि वाहतुकीवर पथकांकडून नजर ठेवली जात आहे. अशातच नवी मुंबईतील महापे एमआयडीसीतून एका वाहनांमधून दारू आणल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे छापा टाकताना १४ लाख ३२ हजार ३२० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. हा दारूसाठा एका वाहनातून दुसऱ्या वाहनात ठेवण्याचे काम सुरू असताना पथकाने ही कारवाई केली होती. या वेळी प्राथमिक तपासात ही दारू ठाणे मार्गे गुजरातमधील अंकलेश्र्वर येथे विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून आठवड्याभरापूर्वीच ठाणे विभागाने एक कोटींचा दारूसाठा पकडला होता.