पुणे : आयसिसच्या महाराष्ट्र गटाचा (माॅड्युल) दहशतवादी विचारधारेचा प्रसार केल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातून आणखी एकास अटक केली. अटक केलेला दहशतवादी मूळचा ठाण्यातील आहे. ‘एनआयए’ने आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. शामिल साकीब नाचन (रा. पडघा, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने यापूर्वी पुण्यातील डाॅ. अदनान अली सरकार याला कोंढवा भागातून अटक केली होती. आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांना ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रिय होता. याबाबतची माहिती एनआयएला मिळाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे येथे कारवाई करण्यात आली होती.
एनआयएच्या पथकाने मुंबईतून तबिश नासेर सिद्दिकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. नाचनला मुंबईतील विशेष न्यायालयात एनआयएच्या पथकाकडून शनिवारी (१२ ऑगस्ट ) हजर करण्यात येणार आहे. पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना युनूस महंमद याकूब साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांना अटक करण्यात आली होती. बडोदावाला याचे पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचे तपासात उघडकीस आले होते. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) साकी आणि खान यांचा शोध घेत असताना बडोदावाला याने त्यांना पुण्यात आणून कोंढव्यात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याचे तपासात उघडकीस आले होते.