विरार : मनोरंजनाच्या नावाखाली पोलीसांकडून मिळालेल्या परवानगीनुसार रात्री १०;30 पर्यंत हे क्लब सुरु असायला पाहिजे ,मात्र क्लबचे संचालक तेथे रात्रदिवस जुगार अड्डा चालवितात. असाच एक प्रकार सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा विरार पोलिसांनी कारवाई करून तो उध्दवस्त केला आहे. याप्रकरणी एकूण ५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मिरा-भायंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील या वर्षातील जुगारावरील ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते. विरार पश्चिमेच्या वर्तक रोड वरील चोरघे वाडीत असेलल्या जीवन बिल्डिंगच्या आवारात भरवस्तीत जुगार सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिासंनी सदर जागेवर छापा टाकला असता तेथे तीन पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक, व्यापारी या वेळी जुगार खेळताना आढळले.
यावेळी पोलिसांनी जागा मालक जनार्दन राऊत, व्यवस्थापक धरम संघवी जुगार चालविणारा नितीन गोसावी यांच्यासह जुगार चालविणारे आणि जुगार खेळण्यासाठी आलेल्या एकूण ५२ जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ सह कलम २८३, १८८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कलम ४१(अ) (१) अन्वये नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाईल फोन, फोन, चार्जर, टिव्ही सेटअप, रोख रक्मक, वह्या, गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) पट्टी, वायर आदी मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना नोटीस बजावली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राणे यांनी दिली.