मुंबई : शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गोरगरीबांना घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यांत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यात आतापर्यंत सुरू झालेल्या ३६६ आपला दवाखान्यांमध्ये २७ लाख ६६ हजार ७३७ रुग्णांनी मोफत उपचार घेतले. तसेच भविष्यात जिल्हास्तरावर आणखी ३३४ आपला दवाखाने कार्यान्वित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’ला मिळणारा चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळता राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ७०० ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १ मे २०२३ पासून आतापर्यंत एकूण ३६६ ‘आपला दवाखाना’ कार्यान्वित करण्यात आले.
राज्यातील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’मध्ये १ मे २०२३ ते २० जुलै २०२४ या काळात एकूण २७ लाख ६६ हजार ७३७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी ३ लाख ३९ हजार ४२५ रुग्णांची मोफत प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली, तर ४७ हजार ५६४ गर्भवती मातांची ‘आपला दवाखान्या’च्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. मंजूर ‘आपला दवाखान्यां’पैकी ३३४ दवाखाने जिल्हास्तरावर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे दवाखाने सुरू झाल्यानंतर अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ होईल, अशी माहिती आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिली.