पुणे : शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांवर आणि ते सुरू ठेवणाऱ्यांवर अत्यंत गांभीर्याने ‘सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल. तसेच, गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार गुरुवारी (ता. १) स्वीकारला. त्यानंतर लगेचच त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच, शुक्रवारी (ता. २) सर्व पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरातील गुन्हेगारी आणि सद्य:स्थितीबाबत आढावा घेतला.
सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खून, खुनाचा प्रयत्न आणि शरीराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. सराईत गुन्हेगारांविरुद्ध आता वेगळ्या पद्धतीने मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात पोलिस गस्त (पेट्रोलिंग) वाढविण्यात येणार असून, त्याबाबत योग्य नियोजन करण्याबाबत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना मारहाण करून लुटणाऱ्या आणि शस्त्राने वार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे अमितेश कुमार यांनी सांगितले. शहरात अवैध धंदे सुरू ठेवल्यास कोणत्याही परिस्थितीत ते सहन केले जाणार नाही. अवैध धंदे पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि वरिष्ठ निरीक्षकांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर शनिवारी (ता. ३) गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच, सोमवारी (ता. ५) वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक होइल. त्यात शहरातील वाहतुकीच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.