मुंबई : बसस्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आणि चोरीचा तपास सुरु केला. पोलिसांनी कारवाई करत मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून विविध कंपन्यांचे ७४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलची किंमत सुमारे ७ लाख ३५ हजार रुपये आहे. सलीम रईस शेख, अल्ताफ तुर्बाली रुपाणी, शहाब इन्साफ खान, रमजान बबमिया लांजेकर आणि हमीद अहमद खान अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपी बसस्थानकात सावज हेरायचे बसमध्ये चढता-उतरताना धक्काबुक्की करत ते प्रवाशांच्या खिशातून, महिलांच्या पर्समधून मोबाईल काढायचे आणि एकमेकांकडे पास करायचे. मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर येथील बसस्थानकावर मोबाईल चोरीच्या घटना वाढत होत्या. वाढत्या तक्रारी पाहता कांदिवली पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. पोलिसांनी सर्व बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीत चोरट्यांचा कारनामा कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक केली आहे. आरोपींच्या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास कांदिवली पोलीस करत आहेत. आरोपींनी मोबाईल चोरल्यानंतर कोणाला विकले? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.