मुंबई : परदेशात स्थायिक करण्याच्या बहाण्याने बोलवून पंजाबमधील तरूणाचे अपहरण करून त्याच्याकडील परदेशी चलन लुटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी सात जणांना अटक केली असून आरोपींनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.
पंजाबमधील होशियारपूर येथील अभिषेक कुमार (२४) आणि त्याचा भाऊ हिमांशु कुमार या दोघांना इटलीमध्ये स्थायिक करण्याचे आमिष दाखवून साकिनाका परिसरात बोलावण्यात आले होते. त्यांना मोटरगाडीत बसवून नवी मुंबईच्या दिशेने सुमारे तीस – चाळीस किलोमीटर अंतरावर नेण्यात आले. तेथे लोखंडी सळीचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोनसाखळी व मोबाइल काढून घेण्यात आला. तसेच हिमांशुच्या डोक्यावर सळीने प्रहार करून त्याच्याकडील ११ हजार ६०० अमेरिकन डॉलर, १०० युरो, २ तोळ्याची सोनसाखळ्या, दोन मोबाइल, दोन कपड्यासह बॅगा असा एकूण ११ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेण्यात आला. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात अपहरण व लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपायुक्त (परिमंडळ-१०) दत्ता नलावडे यांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पथके स्थापन केली. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे याप्रकरणी दलाल हिमांशु गुप्ता याच्यासह सौरभ खरात (२५), प्रतिक शिंदे (२०), दिनेश सातपुते (३०), विशाल थोरात (३१), अनिल शेटे (३१) व राजीव वर्मा (२४) यांनाअटक करण्यात आली. गुन्ह्यामधील अटक आरोपी आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. अमेरिका, यु.के., तसेच युरोपमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्यांना त्या देशाचा व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपी तरूणांना पैसे घेऊन बोलावत होते. त्यानंतर त्यांना मारहाण करून लुटत होते. आरोपींनी अशा प्रकारे अनेकांना लुटल्याचा संशय आहे. आरोपींनी कुर्ला व अंधेरी परिसरात नेऊन अनेकांकडून पैसे काढून घेतले आहेत. याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.