मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) येथील हिरे कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी साडेपाच कोटी रुपये किंमतीच्या हिऱ्यांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिरे व्यापारी संजय बाबूलाल शहा (५५) हे जे.बी. ॲण्ड शहा कंपनीच्या विक्री व मार्केटिंग विभागाचे संचालक आहेत. त्याच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी प्रशांत शहा व वीरेंद्र शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. जे.बी. ॲण्ड शहा कंपनी ही हिऱ्यांना पैलू पाडून त्याची निर्यात करते.
आरोपी प्रशांत व विशाल कंपनीच्या बीकेसी येथील कार्यालयात काम करतात. तक्रारीनुसार,आरोपींनी संगनमत करून त्यांना देण्यात आलेल्या पाच कोटी ६२ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या हिऱ्यांचा अपहार करून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. ४ एप्रिल ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शहा यांनी तक्रार केल्यानंतर सोमवारी भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४०८ (फौजदारी विश्वासघात) व ३४ (सामायिक गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीतील मालमत्ता अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी बीकेसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.