मुंबई : पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून दुकानदारांना धमकावून पैशांची मागणी करणाऱ्या एका महिलेविरोधात नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैला गुरव (३८) असे या महिलेचे नाव असून ती जोगेश्वरी परिसरातील रहिवासी आहे. चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून ही महिला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून दुकानदारांना धमकावून त्यांच्याकडून पैसे घेत होती.
काही दिवसांपूर्वी ही महिला या परिसरातील एका दुकानदाराकडे गेली होती. आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून तिने दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याची मागणी दुकानदाराकडे केली होती. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करून कारवाईची करण्याची धमकी तिने दुकानदाराला दिली होती. दुकानदाराला तिचा संशय आल्याने त्याने याप्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून या महिलेला ताब्यात घेतले आणि नोटीस देऊन तिला सोडून दिले.