मुंबईः गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून २१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली चार कंपन्या, संचालक व दलाल अशा २५ जणांविरोधात अंधेरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्याअंतर्गत (एमपीआयडी) अंबोली पोलीस तपास करीत असून याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तक्रारदार कल्पना तायडे (३९) यांच्या तक्रारीवरून अंबोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ व १२० सह एमपीआयडी कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आय एक्स ग्लोबल, आयएक्स ग्लोबल अकादमी प्रा. यांच्यासह संचालक व दलाल अशा एकूण २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जून २०२२ पासून ३० जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. तक्रारीनुसार, कंपनी, संचालक व दलालांनी गुंतवणूकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून २०२२ पासून आतापर्यंत गुंतवणूक करण्यास भाग पाडले व त्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणात तक्रारदारांसह २१४ गुंतवणूकदारांचे ३५ कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या कंपनीचे कार्यालय अंबोली पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीसोबत दलालांची माहितीही पोलिसांना देण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकरण गंभीर असून त्यात अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या आरोपींचाही समावेश आहे. याशिवाय मुंबई व पालघर विभागातील दलालांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. आतापर्यत २१४ तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.