मुंबई : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटीमध्ये त्यांचे हे उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. २०२४-२०२५ मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, आरक्षणाची डेडलाईन संपल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. २० जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे.