मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात घोषणांचा पाऊस पडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना विविध घोषणा केल्या. त्यात अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आणि महागाईला काही प्रमाणात आळा घालणारी घोषणाही झाली. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पेट्रोल- डीझेलवरील मूल्यवर्धित कर कमी करण्यात आला असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आकारण्यात येणारे मूल्यवर्धित कर कमी करण्यात आले आहे. ते २४ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे पेट्रोल-डीझेल स्वस्त होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करण्यासाठी सूट देण्यात आलीये. त्यांना आकारले जाणारे मुद्रांक शुल्क दंड कपात करण्यात आलेत.
पेट्रोल आणि डिझेलवरील कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर ५ रुपये १२ पैसे वरून २५ टक्के अधिक प्रति लिटर ५ रुपये १२ पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै, २०२२ पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रूपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले.