मुंबई : राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पहाटे ४ वाजता काढून अधिकृतरित्या प्रसिद्ध न करता अधिकाऱ्यांना व्हाट्सवर पाठवण्याच्या हेतूवरही त्यांनी शंका उपस्थित केली. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात महसूल विभागात २०० बदल्या झाल्या असून त्या खालोखाल वन, कृषी, उत्पादन शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून यात मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे ते म्हणाले.
शासन आपल्या दारी आणि अधिकारी मंत्र्यांच्या घरी हा प्रकार चालू असून वन विभागात झालेल्या बदल्यांबाबत भाजपच्याच ४ आमदारांनी तक्रार केल्यानंतर त्या बदल्या थांबविण्यात आल्या.
मात्र कृषी विभागाच्या सचिवांनी या बदल्या होऊ शकत नाही, सदर बदलीस ते अधिकारी पात्र नाहीत, असा शेरा मारला असतानाही त्यांच्या पदोन्नती केल्या गेल्या. उत्पादन शुल्क विभागात
वर्ग ३ व वर्ग ४ चे अधिकार सचिवांकडे असतानाही मंत्र्यांनी त्यांच्या बदल्या केल्या असा थेट आरोप दानवे यांनी करून सदर बदल्यांसाठी झालेल्या भ्रष्ट्राचाराबाबत सरकारवर ताशेरे ओढले.
सरकारी बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. जो अधिकारी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देईल, गैरव्यवहार करेल त्याला हवे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळते आणि मंत्र्यांच्या मनाविरुद्ध काम करणार्या अधिका-यांना पध्दतशीरपणे बाजूला केले जाते असेही दानवे यांनी म्हटले.





