विरार : कामावरून घरी परतताना किराणा सामान खरेदी करण्यासाठी किंवा तातडीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स व प्रिंटसाठी आता वसई-विरारकरांना बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरीय स्थानकांमधील मोकळ्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला असून, नायगाव आणि विरार स्थानकांवर प्रवाशांसाठी थेट किराणा स्टोअर आणि फोटोकॉपी कियोस्क उभारण्यात येणार आहेत. प्रवाशांचा दैनंदिन वेळ वाचवणे आणि रेल्वेला बिगर-भाडे महसूल मिळवून देणे या दुहेरी उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी पाच वर्षांचा करार करण्यात आला असून, लवकरच या सुविधा प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
या सुविधेमुळे प्रवाशांना लोकलमधून उतरल्यानंतर स्थानक परिसरातच पॅकबंद किराणा माल, दुग्धजन्य पदार्थ आणि घरगुती वापराच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. तसेच सरकारी, निमशासकीय किंवा वैयक्तिक कामांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची झेरॉक्स आणि प्रिंट काढण्याची सुविधाही स्थानकातच उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या नियमित ये-जा मार्गात अडथळा निर्माण होणार नाही, अशा मोक्याच्या जागांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत काम करून रात्री उशिरा वसई-विरार परिसरात परतणाऱ्या नोकरदारांसह महिला प्रवाशांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. नायगाव स्थानकात पूर्वेकडील भुयारी मार्ग आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ १२० चौरस फुटांची जागा किराणा स्टोअरसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेसाठी वार्षिक परवाना शुल्क २.१६ लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर विरार स्थानकातील पूर्वेकडील तिकीट आरक्षण कार्यालयालगत ३८७ चौरस फुटांची मोठी जागा देण्यात आली असून, तिचे वार्षिक भाडे ४.५६ लाख रुपये आहे. याशिवाय अंधेरी स्थानकातील १६० चौरस फूट जागेसाठी वार्षिक १३.०९ लाख रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. पाच स्थानकांच्या या कराराचे एकूण मूल्य सुमारे १.२० कोटी रुपये आहे. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, ८८ रेल्वे स्थानकांमधील मोकळ्या जागांचा व्यावसायिक वापर करून प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि रेल्वेचा अतिरिक्त महसूल वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या नव्या सुविधांमुळे नायगाव आणि विरार स्थानके केवळ प्रवासाचे ठिकाण न राहता नागरिकांसाठी बहुउपयोगी सुविधा केंद्रे म्हणून विकसित होणार आहेत.






