मुंबई : भाजपाची वाटचाल ‘वन नेशन, वन इलेक्शन’कडून ‘वन नेशन, वन पार्टी’कडे सुरू असल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. देशातील १३ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करत ही ‘मतचोरी’ ज्ञानेशकुमार यांच्या माध्यमातून होत असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारने ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेतला नाही तर पुन्हा दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. “तीन दिवस काय, तीन महिने तुरुंगात टाकले तरी मी पुन्हा येईन,” असे वक्तव्य करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली असतानाच सीजेपीकडून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबईसह देशातील विविध भागांतील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातातील फलक, घोषणाबाजी, जलसे आणि पथनाट्यांच्या माध्यमातून आंदोलकांनी आपली भूमिका मांडली. मैदानाच्या सहाव्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या ट्रकला व्यासपीठाचे स्वरूप देण्यात आले होते.
यावेळी अभिजीत दिपके यांनी मतदार विशेष पुनर्विलोकन (SIR) प्रक्रियेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपाने महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला. मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावाही त्यांनी केला. मागील दोन वर्षांत १३ कोटी मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे सांगत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच २०२२ ते २०२६ या कालावधीत निवडणूक जिंकल्यानंतर १११ विद्यमान खासदार आणि आमदारांनी पक्ष बदलल्याचा दावा त्यांनी केला. भाजपाकडून प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमधील फुटीवर भाष्य केले. हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवरून समाजात मतभेद निर्माण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. देशहितासाठी नागरिकांनी धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, आंदोलनानंतर घोषणाबाजीवरून सीजेपी कार्यकर्ते आणि हिंदू विंगच्या काही समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.






