मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आयोजित करण्यात आलेल्या धडक मोर्चाच्या मार्गात सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बदल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला आमदार मिलिंद नार्वेकर, मनसे नेते अविनाश अभ्यंकर, माजी नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान उपस्थित होते. अनिल परब यांनी सांगितले की, पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार मोर्चाचा पूर्वनियोजित मार्ग बदलण्यात आला आहे. यापूर्वी हा मोर्चा भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रुडास येथून मुंबई महानगरपालिका मुख्यालय (सीएसएमटी) पर्यंत काढण्यात येणार होता. मात्र, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर नवीन मार्ग निश्चित करण्यात आला. जुन्या मार्गावर उड्डाणपूल असल्याने आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता. तसेच महापालिकेने रस्त्यांच्या मधोमध उभारलेल्या सुमारे साडेतीन ते चार फुटांच्या दुभाजकांमुळे सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून जुना मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परब यांनी स्पष्ट केले.
आता हा मोर्चा मेट्रो सिनेमा येथून सुरू होऊन मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आवारात समाप्त होणार आहे. यापूर्वी काढण्यात आलेल्या ‘सत्याचा मोर्चा’साठी वापरण्यात आलेल्या मार्गावरूनच हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. मार्ग बदलण्यात आला असला तरी मोर्चाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नियोजित वेळेनुसार हा मोर्चा सकाळी १० वाजता सुरू होणार असून, त्याचा समारोप पूर्वीप्रमाणेच महापालिका मुख्यालयासमोरील पत्रकार संघाच्या आवारात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, मित्रपक्ष तसेच सामान्य नागरिकांनी नवीन मार्गाची नोंद घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





