मुंबई : सणासुदीच्या काळात मुंबईत मालवाहतूक करणाऱ्या आणि व्यावसायिक वाहनचालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या ५ प्रमुख टोलनाक्यांवर १ ऑक्टोबर २०२६ पासून टोल शुल्कात २० टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे. निश्चित नियमांनुसार ही सुधारित दरवाढ करण्यात आली असून, आता मिनी बसपासून ते मोठ्या अवजड वाहनांपर्यंत मुंबईत प्रवेशासाठी ₹९० ते ₹२२५ पर्यंत टोल शुल्क भरावे लागणार आहे.
या टोलवाढीतून मात्र सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. हलकी मोटारी, खासगी कार आणि जीप यांना देण्यात आलेली संपूर्ण टोलमाफी कायम ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार छोट्या खासगी वाहनांना मुंबईतील टोलनाक्यांवर शुल्क भरावे लागणार नाही. तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस आणि राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसनाही टोलमधून सूट देण्यात आली आहे. नवीन दरांनुसार मिनी बस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी यापूर्वी असलेला ₹७५ चा टोल आता ₹९० करण्यात आला आहे. सामान्य बसेस आणि मध्यम आकाराच्या ट्रकसाठी पूर्वीच्या ₹१५० ऐवजी आता ₹१८० शुल्क आकारले जाणार आहे. तर अतिअवजड मल्टिअॅक्सल वाहनांसाठी पूर्वीच्या ₹१८० ऐवजी आता ₹२२५ टोल भरावा लागणार आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाशी नाका, दहिसर नाका, मुलुंड पूर्व नाका, मुलुंड पश्चिम नाका आणि ऐरोली खाडी पूल नाका या ५ महत्त्वाच्या ठिकाणी नवीन टोल दर लागू झाले आहेत. मात्र, मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरील टोलचे दर स्वतंत्र दरपत्रकानुसार सुरू राहणार आहेत. मुंबईतील उड्डाणपुलांच्या बांधकाम खर्चाची भरपाई करण्यासाठी सप्टेंबर २००२ मध्ये टोलवसुली सुरू करण्यात आली होती. करारानुसार नोव्हेंबर २०२६ मध्ये टोलनाके बंद होणे अपेक्षित होते. मात्र, २०२४ मध्ये सरकारने लहान वाहनांना टोलमाफी दिल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला झालेल्या सुमारे ₹९०० कोटींच्या नुकसान भरपाईसाठी टोलवसुलीची मुदत वाढवण्यात आली आहे. आता ही टोलवसुली थेट १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत सुरू राहणार आहे.






