पुणे : सप्टेंबर महिन्याच्या चालू देयकासह महावितरणच्या पुणे विभागातील तब्बल ६८२ कोटी रुपयांची थकबाकी येत्या १० दिवसांत वसूल करण्याच्या सूचना महावितरणच्या वाणिज्य विभागाचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांनी पुणे विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या. वसुलीसोबतच वीज गळती कमी करणे आणि ग्राहक सेवा सुधारण्यावरही त्यांनी भर दिला. ‘काळ बदलला आहे. बघतो, करतो, पुढच्या महिन्यात होईल, अशी उत्तरे आता चालणार नाहीत. यापुढे काम अपेक्षित आहे. उद्दिष्टपूर्ती झाली नाही, तर कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असा इशाराही अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिला.
महावितरणच्या पुणे आणि बारामती विभागाचे पालक संचालक म्हणून दिनेश अग्रवाल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी विभागातील वसुली, वीज गळती आणि अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. या बैठकीला पुणे विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम आणि सहायक महाव्यवस्थापक कीर्ती भोसले उपस्थित होत्या. ‘शंभर टक्के वसुलीबरोबरच वीज गळती कमी करण्यासाठी ठोस ॲक्शन प्लॅन तयार करा. त्यानुसार कामाचे नियोजन करून निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करा. तसेच, ग्राहक सेवा, वीजपुरवठ्याची गुणवत्ता, वसुली आणि वीजगळती कमी करण्याच्या कामात ठोस परिणाम दिसला पाहिजे. केवळ नियोजन न करता त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यातून अपेक्षित परिणाम साध्य झाले पाहिजेत,’ अशा सूचना अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वीजचोरांविरोधातील मोहीम तीव्र करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महावितरणच्या पुणे विभागाने सप्टेंबर महिन्याच्या चालू देयकासह १ हजार २५४ कोटी रुपये वसूल करणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत ५७१ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, ६८२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वीज ग्राहकांच्या समस्या व तक्रारींचे स्थानिक पातळीवर निराकरण करण्यासाठी महावितरणच्या पुणे विभागात सोमवारी (२१ सप्टेंबर) ‘ग्राहक समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ५२ उपविभागीय कार्यालयांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. पुणे विभागात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘ग्राहक समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात वीज देयक, वीजपुरवठा, मीटर, वीजजोडणी तसेच महावितरणच्या विविध सेवा आणि योजनांशी संबंधित तक्रारी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर मांडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या शिबिरात १ हजार २९३ ग्राहकांनी सहभाग नोंदवला होता. त्यात ७४४ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यापैकी ६८४ तक्रारी शिबिरातच सोडविण्यात आल्या होत्या.






