पुणे : राज्यात सध्या पेपरफुटीच्या घटनांवरून वातावरण तापले असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेतील औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चात आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी, भीमनवार यांच्या जागी धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होऊ शकते, असा दावा केला. रोहित पवार म्हणाले की, एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष वादग्रस्त आहेत. यापूर्वी ज्या विभागांमध्ये गोंधळ झाला, त्या ठिकाणीही ते कार्यरत होते. विवेक भीमनवार यांची कारकीर्द वादग्रस्त असून, त्यांच्या नियुक्तीला अनेकांनी विरोध केला होता. यासंदर्भातील अनेक पुरावे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना देण्यात आले आहेत. आधीच्या खात्यांमध्ये त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. अनेक वर्षे ते प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत होते आणि आता त्याच प्रकारचे रॅकेट एमपीएससीमध्ये सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील अद्याप केवळ चाळीस टक्के पुरावेच समोर आणले असून, उर्वरित पुरावेही समोर आणण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्याचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवार पुढे म्हणाले की, एमपीएससीच्या अध्यक्षपदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होऊ शकते. याबाबत आपण सर्व बाबी तपासल्या असून, उपलब्ध अटींनुसार मुंढे हे अध्यक्ष होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. विवेक भीमनवार यांच्या विरोधात यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर कारवाई झाली नाही, तर मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत, असा अर्थ काढावा लागेल, कारण ते मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत, असेही रोहित पवार म्हणाले. हे आंदोलन आपले नसून, विद्यार्थ्यांना शक्य तितका पाठिंबा देण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याची मागणी केल्यास आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विरोधात असताना विद्यार्थ्यांसोबत असणारे नेते सत्तेत गेल्यानंतर गप्प का बसतात, असा सवाल करत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “तुमच्यात हिंमत असेल तर तुमचा बॉस चुकत असेल, तर त्याच्या विरोधात जा आणि विद्यार्थ्यांचे कल्याण करा,” असे आवाहनही त्यांनी केले.






