मुंबई : चेंबूर येथील पांजरापोळ परिसरात सुमारे २० मांजरांची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे प्राणिप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर कृत्यामागे एकाच व्यक्तीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मुंबई पोलीस कथित ‘सिरियल कॅट किलर’चा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि त्याला अटक करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला ‘पेटा इंडिया’ या संस्थेने ₹५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुबिना पठाण (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरसीएफ पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कामा वाडी परिसरात त्यांना दोन मांजरी मृतावस्थेत आढळल्या. यापैकी एका मांजरीच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले, तर दुसऱ्या मांजरीच्या शरीरावरही गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या. विशेष म्हणजे, याच घटनेच्या दोन दिवस आधी म्हणजे ३ सप्टेंबर रोजी त्याच परिसरात आणखी चार मांजरांची अशाच प्रकारे अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. रुबिना पठाण यांनी मृत मांजरांचे छायाचित्रे पोलिसांकडे सुपूर्द केली असून, पेटा इंडियाच्या सल्ल्यानंतर दोन मांजरांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्राण्यांवरील वाढत्या अत्याचाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३२५ तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. बीएनएसच्या कलम ३२५ अंतर्गत कोणत्याही प्राण्याला मारणे, विष देणे, अपंग करणे किंवा गंभीर इजा पोहोचवणे हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची, दंडाची किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. सध्या आरोपीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तपास पथके परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा करत असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. पेटा इंडियाच्या क्रुएल्टी रिस्पॉन्स ऑफिसर ईशानी राठी यांनी सांगितले की, प्राण्यांवर अत्याचार करणारे काही लोक पुढे जाऊन इतर प्राण्यांसह माणसांनाही इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि त्याला अटक करण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीला ₹५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, या प्रकरणाबाबत कोणतीही विश्वासार्ह माहिती असल्यास नागरिकांनी info@petaindia.org या ई-मेलद्वारे पेटा इंडियाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. या क्रूर घटनेमुळे प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी प्राणिप्रेमी आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.






