मुंबई : भारतरत्न ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त त्यांना अनोखी संगीतांजली अर्पण करण्यात आली. संगीतकार ए. आर. रहमान यांनी विशेष तयार केलेल्या ‘आशा फॉरएव्हर’ या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाले. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, संगीतकार ए. आर. रहमान, आशा भोसले यांची नात जनाई भोसले, भोसले कुटुंबीय तसेच चित्रपट, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आशा भोसले यांच्या संगीत प्रवासाला उजाळा देत त्यांच्या स्वरांनी भारतीय संगीतविश्वाला दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला. विविध भाषांमधील त्यांच्या हजारो गाण्यांनी अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले असून त्यांचा आवाज आजही रसिकांच्या मनात तितक्याच प्रेमाने जिवंत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीतील संस्मरणीय क्षणांनाही उजाळा देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना आशा भोसले यांचे संपूर्ण आयुष्य हे ऊर्जा, उत्साह आणि संगीतावरील अपार प्रेमाचे प्रतीक असल्याचे सांगितले. नव्वदीतही मंचावर त्यांचा उत्साह आणि सादरीकरणातील जिवंतपणा प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणादायी होता, असे ते म्हणाले. त्यांच्या स्वरांचा ठेवा हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा सांस्कृतिक वारसा असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘आशा फॉरएव्हर’ हे गीत त्यांच्या अजरामर योगदानाला वाहिलेली सुंदर स्वरांजली असून, आशाजींच्या आठवणी आणि त्यांचा सांगीतिक वारसा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “जोपर्यंत आशा भोसले यांची गाणी ऐकली जातील, तोपर्यंत त्या प्रत्येक रसिकाच्या मनात कायम जिवंत राहतील. अशा स्मरणोत्सवांचे आयोजन दरवर्षी व्हावे,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी संगीतकार ए. आर. रहमान, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि गीतनिर्मितीशी संबंधित संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आशा भोसले यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाशी तसेच देश-विदेशातील संगीतप्रेमींशी अतूट नाते असल्याचे सांगितले. मराठीसह हिंदी आणि अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये गायलेल्या त्यांच्या गीतांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘आशा फॉरएव्हर’ हे गीत आशा भोसले यांना विनम्र अभिवादन असल्याचे सांगत, “आशाजी या महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या कन्या आहेत. त्यांचा स्वर आणि सांगीतिक वारसा कधीही संपणार नाही,” असे भावपूर्ण उद्गार काढले. यावेळी जनाई भोसले यांनी या गीताच्या निर्मितीमागील संकल्पना आणि तयारीची माहिती देत, आजींच्या स्मृती जपण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आशा भोसले यांच्या कारकिर्दीचा गौरव करत त्यांच्या संगीताने भारतीय संस्कृतीला दिलेल्या अमूल्य योगदानाला सलाम केला.






